Thursday, February 21, 2008

खांदा राज ठाकरेंचा बंदूक काँग्रेसची..!

राज ठाकरेंना अटक करण्यात राज्य सरकारनं वेळ वाया घालवून त्यांना मोठं केल्याचा आरोप बहुतांश जणांनी केलाय. मात्र, पाहुण्यांच्या हातानं साप मारण्याची काँग्रेसची जुनीच रीत आहे.. राज यांनी परप्रांतियांच्या विरोधात सुर लावल्यानंतर त्यांना रोखण्याऐवजी काँग्रेस सरकारनं बघ्याची भूमिका घेतली. अर्थात या माध्यमातून त्यांनाही त्यांचे काही उद्देश साध्य करायचे होतेच. मुंबईवर परप्रांतियांचे लोंढे आदळताहेत, ही खरीच गोष्ट.. पण त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कायदेशीररित्या काहीच करु शकत नाही हे वास्तव.. नुसते उत्तर भारतीय येत होते तोपर्यंत काँग्रेसला चिंतेचं कारण नव्हतं, मात्र, त्यांच्यासोबत तिथले राजकीय पक्षही राज्यात बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात आहेत. इथे राज ठाकरे आणि काँग्रेसचे उद्देश अप्रत्यक्षपणे एक होतात. राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाचा जम बसवायचा होता, तर, काँग्रेसला त्यांचा परंपरागत मतदार गमवायचा नव्हता. या सगळ्या खेळीत समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं नसतं तर राज ठाकरेंची खेळी वाया गेली असती, मात्र, उत्तर भारतीयांचे आपणच खरे कैवारी असं दाखवण्याची अहमहीका लागलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलं. खरं पाहता या पक्षांचं राज्यातलं मूल्य कमी आहे, मात्र, राजकारणात मुल्याला नव्हे तर उपद्रव मुल्याला महत्व असते. समाजवादी पक्ष काँग्रेसची मत खाऊन निवडून येऊ शकला नाही तरी काँग्रेसचे उमेदवार पडण्याइतपत त्यांची मजल मुंबईत काही प्रमाणात तरी नक्कीच आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसनं चाप ओढला.. दोन्ही पक्षांचं लक्ष्य व्यवस्थित साध्य झालं.. मात्र, त्यात बळी गेला नाशिकचा सामान्य मराठी माणसाचा..

Wednesday, February 13, 2008

राज ठाकरे यांचं काय चुकलं..?

- सुनिल बोधनकर.

मराठी विरुद्ध परप्रांतीय या 'मुद्या'वरून 'गुद्या'वर येऊन हिंसाचार सुरु झाला. राज्यात उत्तर प्रदेश दिन साजरा करु देणार नाही, असा पवित्रा घेऊन राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या वाढत्या अस्तित्वाविरोधात आणि शक्तीप्रदर्शनाविरोधात मतं मांडली. त्यावर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याच दरम्यान मुंबईत समाजवादी पक्षानं देश बचाव रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी मनसे आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमधे काही ठिकाणी हाणामारी झाली. त्यानंतर राज ठाकरे परप्रांतियांच्या जीवावर उठलेत, असा आभास हिंदी वृत्तवाहिन्यांनी करायला सुरुवात केली. राज ठाकरे यांना अटक करावी यापासून ते त्यांच्या पक्षाची राजकीय मान्यता काढून घेण्यात यावी, इथपर्यंत तीव्र प्रतिक्रिया काही उत्तर भारतीय पक्षांच्या नेत्यांनी दिल्या. त्यात मुंबईतल्या परप्रांतियांना सुरक्षेसाठी काठ्या देऊ, अशी प्रतिक्रिया आल्यानंतर राज ठाकरे यांनी तलवार देण्याची भाषा केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना काल अटक आणि लागलीच जामीनावर सुटकाही झाली.

या निमित्तानं काही प्रश्न पुढे आलेत, राज ठाकरे चूक आणि परप्रांतियांच्या बाजूनं गळे काढणारे उत्तर भारतीय नेते बरोबर, असा आभास काही हिंदी वृत्त वाहिन्यांनी उभा केला. मात्र, खरंच अशी परिस्थिती आहे का..? मुंबईत दररोज परप्रांतियांचे लोंढे येऊन धडकतात, त्यातले बहुतांश लोक हे उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून आलेले असतात. काही वर्षांपुर्वी गुजरात आणि दक्षिण भारतातूनही मुंबईत लोकांचे लोंढे यायचे मात्र, कालांतरानं त्यांचं प्रमाण कमी झालं. त्याला कारण होतं त्यांच्या स्वतःच्या प्रदेशात पोटापाण्याची वाढलेली साधनं... आज मुंबईतल्या परप्रांतीयांना सुरक्षा द्या इथपासून ते राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता काढा, असं म्हणणारे हे नेते त्यांच्या प्रांतात गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत होते किंवा आहेत. असं असतानाही त्यांच्या प्रदेशातल्या लोकांना रोजी-रोटीसाठी मुंबईचं तोंड का पहावं लागतं. महाराष्ट्रातल्या परप्रांतियांच्या बाजून गळा काढण्याबरोबरच त्यांच्या राज्यातल्या लोकांसाठी पोटापाण्याची काहीच व्यवस्था का नाही केली, याचं उत्तर या नेत्यांनी द्यायला हवं..

केंद्र स्तरावर तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी समाजवादी पक्षानं मुंबईत एका रॅलीचं आयोजन केलं होतं, मात्र, या रॅलीचं आयोजन मुंबईतच का..? हा प्रश्न अनुत्तरीतच.. या रॅलीत सहभागी होणारा एकही पक्ष महाराष्ट्रातला नव्हता. मग रॅलीच आयोजन मुंबईत करण्यामागं काय प्रयोजन..? का फक्त सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून मुंबईवर लक्ष...

मुंबईत मराठी आणि परप्रांतीय गेल्या अनेक वर्षापासून गुण्यागोविंदानं राहताहेत. त्यांच्यात रोजगारावरून किंवा इतर कारणांवरून मोठा संघर्ष कधीही झाला नाही. सुरुवातीपासून अगदी गोदीमध्ये काम करण्यापासून ते टॅक्सी चालवणं या व्यवसायात परप्रांतीय रुजले. मात्र, या व्यवसायांमध्ये मराठी माणूस कधी नव्हताच, मग कोणत्या मराठी माणसासाठी राज ठाकरे यांनी संघर्ष सुरु केला, हा प्रश्न पडतोच.

या सगळ्या घडामोडीत सरकारची म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका 'राज ठाकरेंच्या लाठीनं पाहूण्यांचा साप' मारायचा अशी होती. राज्यातले परप्रांतीय हा काँग्रेसचा हुकमी मतदार... त्यावर उत्तर भारतातल्या पक्षांनी येऊन डल्ला मारायला सुरुवात केल्यानंतर काँग्रेसला त्रास होणं स्वाभाविकच... तर, राज ठाकरे यांना मोकळीक देऊन शिवसेनेची ताकद खच्चीकरण करता आली तर बरंच, ही राष्ट्रवादीची भूमिका.. तर, राज यांना अटकाव केल्यास मराठीविरोधी असल्याचा काँग्रेसवरचा शिक्का आणखीनच गडद होण्याची भिती काँग्रेसला होतीच. मग, या कात्रीतून सुटका करुन घेण्याआधी स्वतःचा फायदा करून घ्यायचा डावही या पक्षांनी साधला, असं म्हणता येईल.

प्रत्येक वादात नाक खुपसून आपल्याच पक्षाच्या सरकारला अडचणीत आणण्याचे उद्योग केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुनसिंह यांनी याहीवेळी सुरु ठेवले. महाराष्ट्रात निमलष्करी दलं पाठवू, असं वक्तव्यं करून आगीत तेल ओतण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. निमलष्करी दलं पाठवून परिस्थिती शांत करण्यासाठी मीडीयाला आगखाऊ बाईट देण्यामागे त्यांचा काय हेतू तेच जाणोत..

आता राज ठाकरे यांना अटक होऊन त्यांना जामीनावरही सोडण्यात आलंय. दरम्यानच्या काळात मराठीचा कैवार घेणारा अशी त्यांची प्रतिमा करण्यात ते ब-याच प्रमाणात यशस्वी झालेत. अगदी दिल्लीनंही दखल घेतल्यानं तेही मनोमन सुखावले असणारेत.

राज्याचं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपभोवती फिरतंय. या स्पर्धेत स्वतःची एक वेगळी राजकीय भूमिका मांडून त्या माध्यमातून स्वतःचं राजकीय अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला तर त्यांचं काय चुकलं.. नाहीतरी दक्षिण भारतात प्रादेशिक अस्मितेच्या जोरावर सरकारं येतात आणि काही प्रादेशिक पक्षंही चांगलेच फोफावलेत. त्यांच्याविरोधात एवढी तीव्र प्रतिक्रिया कधीही आली नाही, मग, राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी एखादा मुद्दा पुढं आणला तर त्यात एवढं मनाला लावून घेण्याचं इतर राजकारण्यांना काहीच कारण नाही.

या सगळ्या खेळात राज ठाकरे यांच्यापासून ते अगदी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला. अर्थात राजकारणात तात्कालिक फायदे दीर्घकालीन संकटांना आमंत्रण देतात, हा इतिहास लक्षात ठेवायला कोणत्याही पक्षाकडे वेळ नाही. 'आजच आज उद्याच उद्या..' ही प्रवृत्ती वाढतेय. मुद्यांचा राजकारण गुद्यांवर येऊन पोचलं. या सगळ्यात तात्कालिक फायदा झाला असला तरी नुकसान झालं ते केवळ सामान्य माणसांचंच.. त्यात मराठी अमराठी, आपला परप्रांतीय असा भेदभाव नाहीच.. या दंगलीत नाशिक जिल्ह्यातल्या आडगावमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटीक्समध्ये काम करणा-या अंबादास धाराव या सामान्य मराठी माणसाचा बळी गेला, यावरून सामान्यांनी काय तो बोध घ्यावा.

राज ठाकरे यांची अटक आणि हिंदी वृत्तवाहीन्यांचा आक्रस्ताळेपणा..

- सुनिल बोधनकर

राज ठाकरे यांना अटक होण्याआधीच वातावरण तापवण्याचं काम हिंदी वृत्तवाहिन्यांनी केलं. राज ठाकरेंची अटक म्हणजे या वाहिन्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर महत्वाचा विषय वाटावा इतक्या आक्रमकपणे बातम्या देणं सुरु होतं. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सतत वातावरण तापवण्याचं काम या वाहिन्यांनी केलं. मुंबईतले व्यवहार सुरळीतपणे सुरु होते. मुंबईबाहेर राहणा-यांना मात्र, मुंबईत दंगलसदृष्य परिस्थिती आहे की काय अशी भिती वाटावी, इतपत वातावरण बिघडवण्याचं काम या वाहिन्यांनी केलं. जणु काही राज ठाकरेंना अटक केल्यानंतर मुंबईत राहणारे सगळे उत्तर भारतीय एकदम सुरक्षित होतील, असा आभास निर्माण केला जात होता. या सगळ्या प्रकारात स्वतःला मराठी म्हणवून घेणा-या काही वाहिन्याही सामिल होत्या हे दुर्दैव..
राज यांच्या अटकेनंतर प्रत्येक हिंदी वृत्तवाहीनीवर अटकेचा तमाशा, नाटक वगैरे शब्द वापरून वातावरण आणखीनच भडकावण्याचा प्रयत्न सुरु होता. या वृत्तवाहिन्यांना नेमकं काय हवं होतं, शांतता कि दंगल..? राज यांच्या अटकेच्या वृत्तावरून दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये मिठाई वाटली जात असल्याची दृष्यं वारंवार रंगवून दाखवली जात होती. मात्र, अटकेची बातमी अफवा आहे हे स्पष्ट होईपर्यंत वातावरण बिघडलं होतंच. शांत होऊ शकणारी मुंबई या वृत्तवाहीन्यांच्या गळेकापू टीआरपीसाठी पुन्हा पेटली जाण्याचीच शक्यता अधिक होती. या सगळ्या वृत्तवाहिन्यांची कार्यालयं दिल्ली आणि नोएडाजवळ आहेत, त्यामुळे त्यामुळे त्यांच्या एखाद्या बातमीमुळे इथं किती मोठी दंगल होऊ शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना येणार नाही. या सगळ्या वृत्तवाहिन्यांना चाप लावण्यासाठी केंद्रानंच दखल घ्यायला हवी, अनन्था आता या वृत्तवाहिन्यांच्या गळेकापू स्पर्धेत सामान्यांचे गळे कापले जायची वेळ येईल..